मालवण /-

बाजार आटोपून घरी परतणाऱ्या मालवण भरड येथील श्रीमती तारामती विष्णू परकर (वय-७५ ) या पादचारी वृद्ध महिलेला मालवाहू गाडीने दिलेल्या धडकेत उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अपघात आज सकाळी साडे दहा वाजण्याच्या दरम्यान भरड भागात घडला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर येथील सिंधुदुर्ग ट्रान्सपोर्टची गाडी (क्रमांक एम. एच. ०९-बीसी-९८१५) ही घेऊन चालक सचिन कांबळे हा सहकारी बाबू खलीफ याच्या समवेत मालवण येथे कापड, रंग साहित्याचा माल घेऊन आले होते. ते भरड भागातून बाजारपेठ येथे जात असता भरड येथील मुख्य रस्त्यावर बाजारातून घरी परतणाऱ्या तारामती परकर या वृद्ध महिलेच्या डाव्या पायावरून गाडीचे मागील चाक गेले. यात ती वृद्ध महिला गंभीररित्या जखमी झाली.

अपघात झाल्याचे दिसताच स्थानिक नागरिक कल्पक मुणगेकर, राजू आचरेकर, महेश दुदम, नीलेश गवंडी, प्रणव आचरेकर, दीपा आचरेकर, महेश शिरपुटे, सुनील लुडबे, भिवा शिरोडकर, बाबू मांजरेकर यांच्यासह अन्य नागरिकांनी धाव घेतली. अपघातात वृद्ध महिलेच्या डाव्या पायाचा चेंदामेंदा झाला होता. यावेळी घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिस कर्मचारी सुशांत पवार यांनी संबंधित मालवाहू गाडीच्या चालकाकडून अपघाताची माहिती घेत कागदपत्रे ताब्यात घेतली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ रुग्णवाहिका पाचारण करत जखमी वृद्ध महिलेस तत्काळ कुडाळ येथे उपचारासाठी हलविले. अपघात घडल्यानंतर घटनास्थळी वाहतूक पोलिस कर्मचारी गुरुप्रसाद परब, अमित हरमलकर दाखल झाले होते. दरम्यान, कुडाळ येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेणाऱ्या तारामती परकर हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या पश्चात भाऊ, तीन बहिणी, भाचे असा परिवार आहे. सुप्रसिद्ध मूर्तिकार बबन परकर यांच्या त्या भगिनी होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page