वेंगुर्ला /-


नवोदय प्रवेश परीक्षा सन २०२० – २०२१ यासाठी वेंगुर्ले तालुक्यातील रा.कृ.पाटकर हायस्कूल या केंद्रावर १६९ विद्यार्थी – विद्यार्थीनी परीक्षेला बसले होते,त्यापैकी सुमारे ३५ ते ४० विद्यार्थी घाटमाथ्यावरील जिल्ह्यातील होते.तसेच ५ वीच्या स्काॅलरशीप परीक्षेस ४ केंद्रावर ३५९ विद्यार्थी व ८ वीच्या स्काॅलरशीप परीक्षेस २ केंद्रावर १२५ विद्यार्थी बसले आहेत. ह्यापैकीही काही विद्यार्थी परजिल्ह्यातील असल्याची तक्रार पालकांनी भाजपा पदाधिकारी यांचे कडे केली असता भाजपा शिष्टमंडळाने वेंगुर्ले गटशिक्षणाधिकारी गोसावी यांची भेट घेऊन सदर प्रकरणी चौकशी करावी अशी मागणी केली.भाजपा जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई यांनी सदर प्रकरणी जि.प. शिक्षण सभापती अनिषा दळवी यांचेकडे तक्रार केली असता ताबडतोब सभापती यांनी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांना सदर प्रकरणी चौकशी अहवाल पाठवावा असा आदेश दिला.ज्या बाहेर गावच्या विद्यार्थ्यांना दाखले दिले त्या हायस्कूलची तक्रार करुन कारवाईची भाजपाने मागणी केली.यावेळी गटशिक्षणाधिकारी गोसावी यांचेकडे भाजपा शिष्टमंडळाने लिखीत स्वरुपात तक्रार दाखल केली व परिक्षा केंद्र निहाय बसलेल्या विद्यार्थ्यांची नावासहीत यादीची मागणी केली.तसेच सदर यादी शाळानिहाय मिळावी, अशी मागणी केली. येत्या चार दिवसात यादी देण्याचे आश्वासन गटशिक्षणाधिकारी गोसावी यांनी भाजपा शिष्टमंडळास दिले.यावेळी भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,तालुका चिटनीस नितिन चव्हाण,वजराट सरपंच महेश राणे,उपसरपंच नितीन परब,शेखर परब,सूर्यकांत परब, प्रेमानंद भोसले आदी भाजपा पदाधिकारी व पालक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page