सिंधुदुर्ग /-

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने कार्यक्रमांवर बंदी घातल्याने हवालदिल झालेल्या विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींनी आज एकत्र येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडले. तर आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधत जिल्हाधिकार्‍यांना निवेदन सादर केले.

कोरोना महामारीमुळे रंगकर्मींचे होत असलेले हाल आणि कार्यक्रमावरील बंदीमुळे होत असलेली उपासमार याकडे शासनाने दुर्लक्ष केले आहे. याबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि रंगकर्मीच्या विविध मागण्यांसाठी आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने आंदोलन छेडले. कोरोनाच्या नियमांचे पालन करत आज केलेल्या या आंदोलनात हार्दिक शिंगले, दादा कोनस्कर- राणे, सुधीर कलिंगन, देवेंद्र नाईक, तुषार नाईक, सागर सारंग, विवेक कुडाळकर, कल्पना बांदेकर, नमीती गावकर, सुजाता शेलटकर, भूषण बाक्रे, आदी नाट्यकर्मींसह जिल्हाभरातील विविध क्षेत्रातील नाट्यकर्मी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.यामध्ये महिला कलाकरांचाही मोठा सहभाग होता.

गेल्या दीड वर्षात कोरोना महामारीमुळे कार्यक्रमांवर बंदी असल्याने विविध कला क्षेत्रातील रंगकर्मींचे प्रचंड हाल झाले आहेत. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. याबाबत “रंगकर्मी आंदोलन सिंधुदुर्ग” या संघटनेच्या वतीने २९ जुलै रोजी जिल्हाधिकारी याना निवेदन देऊन शासन व प्रशासनाचे लक्ष वेधले होते तर याबाबत योग्य तो निर्णय घेण्यासाठी ८ दिवसाची मुदत दिली होती. मात्र रंगकर्मींच्या मागण्याबाबत कोणतीही दाखल घेतली नसल्याने जिल्ह्यातील रंगकर्मीनी तीव्र नाराजी व्यक्त करत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन छेडून तीव्र संताप व्यक्त केला. तर याबाबत आज जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कोरोना महामारीमुळे गेल्या दीड वर्षात रंगकर्मींचा व्यवसाय ठप्प झाला असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. मात्र या रंगकर्मीकडे शासनाने पाठ फिरवली आहे. कोणतेही सहकार्य किंवा आर्थिक मदत केली नाही. सांस्कृतिक वैभव जपणाऱ्या आणि विविध कलागुणांचा वारसा समर्थपणे चालवणाऱ्या रंगकर्मींची कोरोनामुळे कमाईची सर्वच दारे बंद झाली आहेत. अशावेळी शासनाने त्यांना आर्थिक आधार देणे आवश्यक होते. मात्र शासनाने रोजंदारीवर काम करणाऱ्या रंगकर्मीकडे पाठ फिरवल्याने व सर्वच कार्यक्रमवर बंदी घातल्याने सिंधुदुर्गसह राज्यभरातील रंगकर्मी अस्वस्थ झाले आहेत. त्याच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवावा, असे नमूद केले आहे. आपल्या समस्या व मागण्यांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील रंगकर्मीं एकजूट झाले असून त्यांनी आज मोठ्या संख्येने उपस्थित राहत आपली एकजूट दाखवली. ९ ऑगस्ट या क्रांतिदिनी आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधले.

यामध्ये सिनेमा, मालिका, नाटक, तमाशा, भजन, कीर्तन, भारूड, गोंधळ, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी अशा विविध कला व लोककला सादर करणाऱ्या कलाकारांच्या सोबत वाद्य कलाकाराचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page