सिंधुदुर्गनगरी /-

कळणे येथील खाणीचा बांध फुटून उडालेल्या हाहा:कारात कळणे-तळकट मार्गावरील मोरी तिच्यावरील निम्मा रस्ता वाहून गेल्याने वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक झाली होती. ‘घुंगुरकाठी, सिंधुदुर्ग’ स्वयंसेवी संस्थेने आयोजित केलेल्या उपक्रमात कणकवली येथील युवकांच्या पथकाने सेवाभावी वृत्तीने ही मोरी दिवसभराच्या श्रमदानाने वाहतूकयोग्य बनविली.

‘घुंगुरकाठी’चे अध्यक्ष सतीश लळीत यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कळणे येथील लोहखनिजाच्या खाणीचा मातीचा बांध २९ जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास फुटला. खाणीतील चिखलयुक्त पाणी रहिवाशांच्या शेतजमिनीत आणि घरांमध्ये घुसले. नागरिकांच्या वित्तहानीबरोबरच रस्ता, विजेचे खांब अशा सरकारी मालमत्तेचेही नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करीत असताना कळण्यातून उगाडेमार्गे तळकटकडे जाणाऱ्या एकमेव रस्त्याचे व त्यावरील मोरीचे नुकसान झाले असल्याचे लक्षात आले. मोरीवरील सुमारे ६० ते ७० फुट लांबीचा रस्त्याचा निम्मा भाग वाहून गेला होता. हा एकमेव रस्ता असल्याने दुचाकी आणि कारगाड्यांची वाहतूक अतिशय धोकादायकरित्या सुरु होती.

दुर्घटनेला आठ दिवस उलटले तरी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी मोरी व रस्तादुरुस्तीबाबत कोणतीही पावले उचलली नाहीत. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्याच्यादृष्टीने या मोरीवरील रस्त्याची श्रमदानाने डागडुजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संस्थेने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन कणकवली येथील युवकांच्या पथकाने दिवसभर श्रमदान करुन हा रस्ता वाहतूकयोग्य बनवला. काम चालू असताना पाचसहावेळा मुसळधार पावसाने व्यत्यय आणला. तरीही न डगमगता पथकाने आपले काम सुरु ठेवले. उल्लेखनीय बाब म्हणजे हे काम बाहेरच्या गावातील लोक श्रमदानाने करीत आहे, हे कळल्यावर कळणे येथील ज्येष्ठ नागरिक विश्वास फक्रोजी देसाई (वय अंदाजे ७५) यांनी स्वत:चे फावडे, टिकाव, घमेले आणून अत्यंत उत्साहात सक्रीय सहभाग घेतला आणि पथकाचा जोष वाढवला.

या उपक्रमात सदाशिव राणे, परेश परुळेकर, रमेश पवार, गुरुप्रसाद तेंडुलकर, इरफान शेख, जयवंत सावंत, संदीप सावंत, संतोष राणे, राजेंद्र कदम, विजय सहदेव गावकर यांनी भाग घेतला. सामाजिक कार्यकर्ते विनायक ऊर्फ बाळु मेस्त्री यांनी यामध्ये महत्वाची कामगिरी बजावली. आडाळीचे ग्रामपंचायत सदस्य व पत्रकार पराग गावकर यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहाय्य केले. श्रमदानानंतर या पथकाने आडाळी येथील ‘घुंगुरकाठी भवन’ला भेट दिली. यावेळी श्री. लळीत यांनी पथकातील सर्व सदस्यांनी दाखविलेल्या सामाजिक बांधिलकीबद्दल व योगदानाबद्दल सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page