कुडाळ /-

ऐन गटारी अमावस्येच्या तोंडावर पणदूर येथील शेतकरी धाकू शंकर सावंत यांना काळाने दगा दिला आहे. पणदूर, जितवणे येथील सावंत यांच्या घरगुती पोल्ट्रीमधील विक्रीसाठी तयार असलेल्या सुमारे ६० ते ६५ कोबड्या काल पहाटे वाघेटी सदृश्य एका जंगली जनावराने फस्त केल्या आहेत. त्यामुळे ऐन कमाईच्या वेळीच त्यांना नुकसानीस सामोरं जावं लागलंय.

पणदूर, जितवणे येथील धाकू शंकर सावंत हे शेतकरी असून त्यांनी आपल्या घरालगत छोटी घरगुती पोल्ट्री शेड उभी केली आहे. सुमारे ४ महिन्यांपूर्वी त्यांनी गावठी कोंबड्यांची सुमारे १५० पिल्ले बाळगली होती. त्यातील काही पिल्ले पहिल्याच महिन्यात अज्ञात रोगाने दगावल्या होती. उर्वरित कोंबड्याचे त्यांनी व्यवस्थित जतन करून ठेवले होते. कारण उद्या रविवारी असणाऱ्या गटारी अमावस्येच्या निमित्ताने विक्री वाढून चांगलानफा प्राप्त होणार होता. परंतु काल पहाटे २ ते ५ वाजण्याच्या दरम्यान वाघेटी सदृश्य जंगली जनावराने पोल्ट्री शेडला लावण्यात आलेल्या जाळीच्या फटीतून आत शिरत आतील सर्व कोंबड्यांच्या डोक्याला चावा घेतल्याने पोल्ट्री शेड मधील सर्वच्या सर्व ६० कोंबड्या मृत झाल्या आहेत. उद्या होणाऱ्या गटारी अमावास्येला या सर्व कोंबड्यांना सुमारे प्रति पक्षी सुमारे ४०० ते ५०० रुपये एवढा भाव मिळणार होता. त्यामुळे या गरीब शेतकऱ्याचे सुमारे ३०,०००/- रुपयांचे नुकसान झाले आहे.

पणदूर सरपंच दादा साईल यांना ही घटना कळताच त्यांनी घटना स्थळी धाव घेतली. वनक्षेत्रपाल अमोल चिरमे, वनपाल दत्तगुरु पिळणकर, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत मूळे, पोलीस पाटील देऊ सावंत, उपसरपंच बबन पणदूरकर, माजी उपसरपंच आबा सावंत, वनरक्षक शिंदे, रामदास घुगे इ. घटनास्थळी येत पंचयादी पूर्ण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page