सायबर सेलचे पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सुतार आणि सहकाऱ्यांची कर्तव्यदक्षता

ओरोस /-

सध्या सिंधुदुर्गात देखील सायबर क्राईमचे प्रकार वाढत चालले आहेत. ओरोस येथूनही अशीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्याला बक्षीस लागले आहे, असे खोटे सांगून ‘फोन पे’ च्या माध्यमातून ओरोस येथील जितेंद्र चव्हाण यांना एका अज्ञात व्यक्तीने तीस हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मात्र सिंधुदुर्ग पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे गेलेली रक्कम संबंधिताला परत मिळाली आहे. फसवणूक करणारी व्यक्ती राजस्थान मधील आहे, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

चव्हाण हे ओरोस येथे नाभिक व्यवसाय करतात. जितेंद्र चव्हाण यांना फोनवर एका अज्ञात व्यक्तीने तुम्हाला ४ हजार ९९० रुपयांचे गिफ्ट लागले आहे, असे सांगून ‘फोन पे’ वर आलेला मॕसेज रिसिव्ह कर, असे सांगितले होते. दरम्यान चव्हाण यांना याविषयी काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी ‘फोन पे’ वरील ‘पे’ बटनावर क्लिक केले. त्या व्यक्तीने एकूण पाच वेळा त्या बटनावर क्लिक करायला सांगितले. चव्हाण यांनी तसे केल्यामुळे त्यांचे तब्बल तीस हजार रुपये गेले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात त्यांनी या प्रकरणाची तक्रार एनसीपीआय या पोर्टलवर केली. त्यामुळे सायबर सेलच्या टीमने त्यांना सहकार्य केले आणि त्यांचे गेलेले तीस हजार रुपये त्यांना परत मिळवून देण्यास मदत केली. यासाठी सायबर सेलचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सुतार यांच्यासह स्वप्नील तोरस्कर, धनश्री परब, दिव्या राणे आदी सहकार्‍यांनी परिश्रम घेतले. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सुतार यांच्या म्हणण्यानुसार, चव्हाण यांनी वेळीच तक्रार केल्यामुळे त्यांचे पैसे परत मिळू शकले. अशाप्रकारे जर अजून कोणाची फसवणूक झाल्यास संबंधित व्यक्तीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा. तसेच फोनवरून कोणीही ओटीपी, पासवर्ड आधीची माहिती मागितल्यास देऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page