कणकवली /-

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेकांचे संसारसाहित्य होत्याचे नव्हते झाले. सिंधुदुर्गातही अतिवृष्टीमुळे हानी झालेल्या हातावर पोट असणाऱ्या गरजवंतांना अन्नधान्य देऊन सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी माणुसकीचा धर्म पाळला असल्याचे गौरवोद्गार कणकवली तहसीलदार रमेश पवार यांनी काढले. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांच्या वतीने जुलै महिन्यात झालेल्या प्रलयकारी अतिवृष्टीबाधित कणकवली तालुक्यातील ओसरगाव कानसाळीवाडी येथील गरजू कुटुंबासाठी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. ओसरगाव कानसाळीवाडीत वडार , धनगर समाजातील हातावर पोट असणाऱ्या मजूर कामगारांची वस्ती आहे. चिरेखाणीवर काम करणारे, मोलमजुरी करणारे कामगार आपल्या कुटुंबकबिल्यासह येथे राहतात. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी चा फटका या कामगारांच्या झोपडीवजा घरानाही बसला. त्यासोबतच अतिवृष्टीमुळे त्यांचा रोजगारही बुडाला. मुंबईतील सामाजिक कार्यकर्ते मनोज सोनवणे यांनी अतिवृष्टीबाधित गरजू कुटुंबाना जीवनावश्यक वस्तू देण्यासाठी दहिसर येथील मुख्याध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते दीपक गावडे यांच्याशी संपर्क साधला. दीपक गावडे यांनी याबाबत पत्रकार राजन चव्हाण यांना कल्पना दिली. पत्रकार राजन चव्हाण यांनी मनोज सोनवणे , दीपक गावडे यांच्या वतीने तहसीलदार रमेश पवार यांच्या हस्ते ओसरगाव कानसाळीवाडी येथील 20 कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण केले. यासाठी ओसरगाव माजी उपसरपंच चंद्रहास उर्फ बबली राणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page