ववेंगुर्ला /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव माध्यमिक शाळा राज्यस्तरावर – वेंगुर्ला
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा) औरंगाबाद यांच्यावतीने राज्यातील उत्कृष्टतेचा ध्यास घेऊन काम करणाऱ्या काही शाळांच्या केस स्टडीजचे संकलन नुकतेच करण्यात आले.यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरे या एकमेव माध्यमिक शाळेची राज्यस्तरावर निवड करण्यात आली असून केस स्टडीज च्या फ्लिपबुक मध्ये या शाळेचा समावेश करण्यात आला आहे.
अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके कितीही उदिष्टनुवर्ती असली तरी प्रत्यक्षात शिक्षणप्रक्रियेत शाळेची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. श्री देवी सातेरी हायस्कूल वेतोरेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्येच्या दृष्टीने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून सुरू केलेला आपला प्रवास निश्चितच इतरांना प्रेरणादायी ठरणारा आहे.
नाविन्याची कास स्वीकारणाऱ्या या शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर यांनी शालेय प्रशासन, स्वयं -विकास, अध्ययन – अध्यापन सुधारणा,संघबांधणी,नवोपक्रम,शालेय व्यवस्थापन या नेतृत्वाच्या सप्तसूत्रीतून आपल्या शाळेचे वेगळेपण, स्वतः ची एक नवीन ओळख तयार केली आहे. आपल्या शाळेत निरलसपणे केलेले काम,शाळेविषयी असलेला जिव्हाळा व आपुलकी यातूनच यापूर्वी शाळेला ‘उपक्रमशील शाळा पुरस्कार’ मिळाला असून आता या शाळेची निवड राज्यातील सर्वोत्कृष्ट माध्यमिक च्या एकूण ७२ शाळांमध्ये झाल्याने संस्था चेअरमन दिगंबर नाईक आणि कार्यवाह प्रभाकर नाईक यांनी मुख्याध्यापिका स्वाती वालावलकर आणि त्यांच्या संपूर्ण टीम चे खास सत्कार करून अभिनंदन केले आहे.
सत्काराला उत्तर देताना स्वाती वालावलकर म्हणाल्या की, केवळ शाळेत जाणे,पुस्तकी अभ्यासक्रम पूर्ण करून परीक्षा घेणे एव्हढेच काम माझा सहकारी शिक्षक वर्ग करीत नसून त्याहीपलीकडे यशस्वी जीवन जगण्याची कला ते विद्यार्थ्यांना अवगत करतात.विद्यार्थ्यांचे सुप्त गुण ओळखून त्यांचे ध्येय त्यांनी गाठण्यापर्यंतचा गौरवास्पद प्रवास माझा शिक्षक घडवून आणतो आणि केवळ याच त्यांच्या कौशल्यामुळे विद्यार्थ्यांना कार्य करण्याची ऊर्जा,प्रेरणा मिळते आणि म्हणूनच या यशामागे माझा सहकारी वर्ग व वेगळा ध्यास घेऊन शिकणारा माझा विद्यार्थी वर्ग आहे.या शाळेचा केस स्टडीज च्या फ्लिपबुक मध्ये समावेश करण्यात आल्याने संस्थाचालक, पालक, ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page