कणकवली /-

कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्वच्छतेसाठी व्यतीत केले. स्वच्छता आणि श्रमदान हीच खरी सेवा आहे, हे संस्कार आप्पा साहेबांनी कणकवलीतील गोपुरी या आपल्या कर्मभूमीत रुजविले. ते संस्कार कणकवलीतील गोपुरी आश्रमामध्ये आजही जीवंत असल्याचे उदाहरण आताच्या चिपळूणमधील महापुरामध्ये झालेल्या नुकसानग्रस्तांच्या मदतीवेळी पहावयास मिळाले. “सदैव सैनिका पुढेच जायचे” हे ब्रीद घेऊन आप्पाप्रेमी गोपुरी आश्रम कणकवली येथून थेट श्रमदानाच्या सेवेतून स्वच्छता मोहीम राबविण्यासाठी चिपळून येथे रवाना झाले. १६ स्वयंसेवक झाडू, खोरी, घमेली, मांगेरे, कोयते, पाणी स्प्रे पंप इत्यादी आपले साहित्य घेऊन दोन दिवसांचा श्रमदानाचा कार्यक्रम ठरवून दिनांक २९ जुलै, २०२१ रोजी पहाटे ५.०० वाजता चिपळूणच्या दिशेने निघाले. सकाळी १०.०० वाजता चिपळूणला पोहोचल्यावर येथे मदतीसाठी कार्यरत असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या मार्गदर्शनाखाली कामाला सुरुवात केली. सर्वप्रथम चिपळूण शहरापासून ८ किलो मीटरवर नदीच्या काठावर असलेल्या दळवटणे या गावातील गणेश वाडीमध्ये जाऊन तेथील प्राथमिक आरोग्य केंद्राची स्वच्छ्ता मोहिम हाती घेतली. या आरोग्य केंद्राच्या इमारतीमध्ये साधारणतः ५ फूट पाणी आतमध्ये शिरले होते. आतमधील सर्व साहित्य, कागदपत्रे अस्ताव्यस्त पडली होती व पाऊलभर चिखल आत होता. गोपुरीच्या सर्व स्वंयसेवकांनी आतमध्ये जाऊन टेबल, खुर्च्या, भांडी व अस्ताव्यस्त पडलेलं सर्व साहित्य बाहेर काढलं आणि आतील सगळा साचलेला गाळ, चिखल बाहेर काढला. त्यानंतर पाणी प्रेशर पंपाच्या साहाय्याने संपूर्ण ईमारत स्वच्छ करून दिली. त्यानंतर येथील नदी किनारी राहत असलेल्या घरात गणेश वाडीतील अब्दुल महिद फकिर कळवेकर यांच्या व त्यांच्या पत्नी दोघेच वयोवृद्ध राहत होते. या अतिवृष्टीमुळे त्यांच्या घरातही अगदी ढोपरभर चिखल साचला होता. त्यातच सर्वत्र चादरी, अंथरूण, टोप, भांडी पडलेली होती. गेपीरी आश्रमच्या स्वयंसेवकांनी तेथे जाऊन त्यांच्या घरातील साचलेला गाळ बाहेर काढून साफ सफाई करून दिली. अशा प्रकारे दिवसभराची स्वच्छ्ता मोहीम पूर्ण करून सायंकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक भवन येथे राष्ट्र सेवा दल मदत केंद्राच्या ठिकाणी मुक्काम केला.

दुसऱ्या दिवशी सकाळी ९.०० वाजता तांबट आळी येथील नुकसान झालेल्या गरजू कुटुंबांना भेट देऊन त्यांना अन्नधान्य व कपडे इत्यादी साहित्य वाटप केले. त्यानंतर मुरादपुर येथील पूर्ण प्राथमिक शाळेमध्ये साफसफाई करण्यासाठी स्वयंसेवक पोहचलो. या इयत्ता ७ वी पर्यंत असलेल्या या शाळेचे खुप नुकसान झाले होते. शाळेत जवळपास १५ ते १६ फूट पाणी आतमध्ये आले होते. शाळेतील एकूण ७ खोल्या व पुढचा व्हरांडा संपूर्णपणे चिखलमय झाला होता. सर्व टेबल, खुर्च्या, बँच, संगणक, टिव्ही, कपाट हे साहित्य पूर्ण चिखलाने भरले होते. गोपुरीच्या या स्वयंसेवकांनी बाहेरील व्हरांड्यापासून चिखल काढायला सुरुवात करत सर्व खोल्यांमधील चिखल काढून पाण्याने स्वच्छ धुऊन घेतल्या. त्यानंतर सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुऊन व्यवस्थितरित्या लावून ठेवले. कणकवलीतील आप्पाप्रेमींचे हे काम पाहून या शाळेतील मुख्याध्यापक व इतर शिक्षक भारावून गेले व त्यांनी भावनिक होऊन सर्वांचे आभार मानले. संध्याकाळी ५ वाजेपर्यंत शाळेतील काम आटोपून झाले. शाळेच्या बाजूलाच असलेल्या राजेश शिर्के यांचे दुकान गाळे पूर्णपणे पाण्याखाली गेलेले होते, त्यांचे जवळपास २ लाखाचे साहित्य चिखल व पाण्याने खराब झाले होते. स्वयंसेवकांनी हे सर्व साहित्य बाहेर काढून व आतील चिखल काढून गाळा स्वच्छ धुऊन घेतला. त्यानंतर दुकानातील सर्व भांडी, डबे, ट्रे, रॅक, फ्रिज इत्यादी साहित्य साफ करून व्यवस्थित लावून दिले. अशा प्रकारे २ दिवसांच्या आयोजनाप्रमाणे चिपळूणमधील या महाभयानक संकटामध्ये श्रमदान रुपी सेवा करून कोकण गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांचा स्वछतेचा वसा पुढे अविरत चालू ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

गोपुरी आश्रमाच्या या स्वयंसेवकांमध्ये कणकवली तालुक्यातील महेश कोेदे, बाळू मेस्त्री, परेश परुळेकर, रमेश पवार, रोहित खारकर, परेश वाळके, अभिषेक चव्हाण, व्यंकटेश सावंत, मंगेश नेवगे, बाबू राणे, विराज राणे, अक्षय मुळये, संतोष राणे, बाळा पोईपकर, संदीप सावंत व जयवंत सावंत हे कार्यकर्ते सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page