कणकवली /-
गेल्या आठवड्यातील अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या. कळणे येथे झालेल्या भूस्खलनाचे कारण अतिवृष्टीपेक्षा मायनिंग मध्ये दडले आहे. त्यामुळे कळणे सोबत जिल्हाभरातील नागरिकांनी मायनिंग नकोच, अशी भूमिका घेतली आहे. काल खास. विनायक राऊत यांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग बंदची मागणी केली होती. परंतु प्रत्यक्षात पाहता सर्व राजकीय पुढाऱ्यांचे मायनिंग हे उत्पादनाचे साधन झाले. मायनिंगला पाठीशी घालण्याचे काम सर्वच लोकप्रतिनिधी करत आहेत. या मायनिंगच्या विरोधात मनसेने यापूर्वी आवाज उठविला असतानादेखील कोणत्याही प्रकारची दखल अजूनपर्यंत घेतली गेली नाही. त्यामुळे येत्या १५ ऑगस्टनंतर ‘अप्पर जिल्हाधिकारी हटाव, पर्यावरण बचाव’ असे आंदोलन मनसेच्या माध्यमातून उभारणार असल्याचा इशारा मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी दिला आहे.

जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे डोंगर खचण्याचे प्रकार घडले आहेत. अनेक ठिकाणी जनतेचा लोकप्रतिनिधीं विरोधात असलेला आक्रोश दिसून येत आहे. कळणे गावात भूस्खलनामुळे भयंकर नुकसान झाले. मात्र या त्रासाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. कणकवली तालुक्यातील कासार्डे, पियाळी या भागातही अशाच प्रकारची अवस्था आहे. पियाळी येथे मायनिंग करणाऱ्यांवर ८४ लाखाचा दंड होऊनही कार्यवाही करण्यात आलेली नाही. गौण खनिजाच्या २०१३ च्या नियमाप्रमाणे अधिकाऱ्यांकडे मागणी केली असता अधिकारी काहीही माहिती देत नाहीत. खासदारांनी कळणे येथे भेट दिली असता तेथील नागरिकांनी मायनिंग रद्द करा, ही मागणी लावून धरली. मात्र जोपर्यंत सिंधुदुर्गातील अप्पर जिल्हाधिकारी यांची बदली होणार नाही, तोपर्यंत मायनिंग रद्द होणार नाही. कारण त्यांचेच मोठे समर्थन या मायनिंग करणाऱ्यांना प्राप्त आहे. या मायनिंग समर्थक अधिकाऱ्यांना का हटविले जात नाही? सत्ताधारी यामध्ये सामील आहेत का? असा प्रश्न आता नागरिकांना पडला आहे. त्यामुळे या अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची बदली करण्यात यावी, या मागणीसाठी १५ ऑगस्ट नंतर मनसेच्या माध्यमातून मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशाराही उपरकर यांनी दिला आहे. ‘अप्पर जिल्हाधिकारी हटवा, पर्यावरण वाचवा’ ही आमची मागणी असल्याचे परशुराम उपरकर म्हणाले.

मायनिंग विरोधात माझ्या आमदारकीच्या काळात मी वेळोवेळी आवाज उठविला. मात्र आता सत्ताधारी आणि विरोधी लोकप्रतिनिधी यांची मायनिंग मालकांसोबत हप्तेबाजी सुरू आहे. या मायनिंग विरोधात आता जनतेनेच पेटून उठण्याची वेळ आली आहे राज्यकर्ते आपल्या मदतीला येणार नाहीत याची जाणीव ठेवून जनतेने आंदोलन उभारावे, असे आवाहन परशुराम उपरकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page