ऑगस्ट पर्यंत चालणार अभियान सहभागी होण्याचे सीईओ नायर यांचे आवाहन..

ओरोस /-

ग्रामीण भागातील जनतेला शाश्वत शुध्द पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी गाव कृती पंधरवडा अभियान राबविण्यात येत आहे. जलजीवन मिशन अंतर्गत २२ जुलै पासून हे अभियान सुरू झाले असून ७ ऑगस्ट पर्यंत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानात सर्वांना सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे. सिंधुदुर्ग जिल्हयाची भौगोलिक रचना सागरी, नागरी व डोंगरी स्वरुपाची असून उन्हाळी ग्रामीण भागाला पाणीटंचाईला मोठया प्रमाणात सामोरे जावे लागते. शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत विविध कामे हाती घेवून नैसर्गिक स्त्रोतांचे संवर्धन करुन नवीन स्त्रोत निर्माण करुन नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करावयाचे आहे. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक व्यक्तीला ५५ लिटरप्रमाणे शाश्वत आणि शुध्द पाणीपुरवठा करण्याचे 2024 पर्यंत उद्दिष्ट असून त्या अनुषंगाने शासनाच्या जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नुकतीच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, जिल्हा कक्षाचे सल्लागार व डाटा एन्ट्री ऑपरेटर यांना गाव कृती आराखडयाबाबत प्रशिक्षण देण्यांत आले. यामध्ये माहिती संकलन राबविण्याच्या प्रक्रिया कोबोटूलव्दारे माहिती अपलोड करणे आदि प्रशिक्षण देण्यांत आले. दुसऱ्या टप्यात उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामिण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, उप अभियंता, शाखा अभियंता, भूवैज्ञानिक व तालुकास्तरावरील गटविकास अधिकारी, उपअभियंता व शाखा अभियंता, गट समन्वयक, समूह समन्वयक यांना झूम ॲप व्दारे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती सीईओ नायर यांनी दिली. गावकृती आराखडा प्रशिक्षणाचे आयोजन तालुका पातळीवर गटविकास अधिकारी यांच्यामार्फत ३१ जुलै दरम्यान गावकृती आराखडा प्रशिक्षणाचे आयोजन करण्यांत येणार आहे. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक, पंप ऑपरेटर, आशा वर्कर, पाणी व स्वच्छता समितीचे दोन सदस्य इत्यादी झुम ॲपव्दारे प्रशिक्षण आयोजन केले आहे. गावपातळीवर १ ते ३ ऑगस्ट या कालावधीत कोबो टूल साधनाचा वापर करुन गावकृती आराखडा तयार करण्याची माहिती देण्यांत येणार आहे. ५ ते ७ ऑगस्ट दरम्यान प्राप्त माहितीवरुन कृती आराखडयाची निर्मिती व गावकृती आराखडा प्रक्रिया करुन येत्या १५ ऑगस्ट २०२१ रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता कार्यक्रम पत्रिकेवर ठेवण्यांत येणार असल्याचे प्रजित नायर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page