कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर ग्राहक मंच सिंधुदुर्ग शाखेमार्फत ऑनलाईन व्याख्यानाचे आयोजन..

वैभववाडी /-

कोरोना महामारी पासून आपला बचाव करण्यासाठी कोणताही एक मार्ग पुरेसा नाही. परंतु योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य औषधोपचार व पूर्व दक्षता घेतल्यास कोरोनापासून बचाव करणे शक्य आहे असे मत मुंबईचे सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ प्रशिक्षक मा. विनयकुमार आवटे यांनी व्यक्त केले.
ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेच्यावतीने शनिवार दिनांक १७ जुलै २०२१ रोजी रात्री ठीक आठ वाजता गुगल मिट ॲपवर “नैसर्गिक आपत्ती व कोरोनाची तिसरी लाट येण्यापूर्वीची पूर्वतयारी” या विषयावर आयोजित केलेल्या ऑनलाईन व्याख्यानात आवटे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय लाड यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
कोरोना महामारी ही नैसर्गिक की मानवनिर्मित आपत्ती हा वादाचा मुद्दा आहे. कोरोनाची पहिली लाट संपून दुसरी लाट संपत असतानाच तिसरी लाट येण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रत्येक लाटेच्या वेळी कोरोनाचा विषाणू आपले रूप बदलत असून त्यावर हमखास औषध व उपचार पद्धती नाही. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी योग्य आहार, व्यायाम, मानसिक संतुलन, योग्य औषधोपचार व पूर्व दक्षता या पंचसूत्रीचा वापर केल्यास कोरोना पासून बचाव करणे शक्य आहे. आयुष मंत्रालयाने कोरोनाबाबत योग्य मार्गदर्शन व औषधे यांची मोफत माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. होमिओपॅथी उपचार पद्धतीने अनेक रुग्णांना स्वतः बरे केल्याचे त्यांनी सांगितले. कोणत्याही आपत्तीला न घाबरता तोंड दिले पाहिजे. कारण अशा प्रकारच्या आपत्ती होत्या, आज आहेत आणि भविष्यामध्ये राहणार आहेत.

कोरोनारुपी महामारी पासून बचाव करण्यासाठी काही पथ्य पाळून नियमांचे पालन केले पाहिजे. ग्राहक पंचायत महाराष्ट्र- कोकण विभाग, सिंधुदुर्ग जिल्हा शाखेने या महामारीच्या काळात प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जोपासली आहे, असे अध्यक्षीय भाषणात डॉ. विजय लाड यांनी सांगितले. यावेळी संस्थेचे राज्य सचिव अरुण वाघमारे, आयुष्य मंत्रालयाच्या प्रतिनिधी शर्मा यांनी योग्य वेळी योग्य कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.

या ऑनलाईन व्याख्यानाला संस्थेचे राज्य संघटक सर्जेराव जाधव, सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष डॉ. ज्ञानचंद्र पाटील, मुंबई विद्यापीठ आजीवन अध्ययन व विस्तार विभागाचे संचालक डॉ. दिलीप पाटील, पोलीस निरीक्षक गंगावणे, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गावडे, पत्रकार संजय खानविलकर, जिल्हा शाखेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा संघटक सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांनी केले. सूत्रसंचालन व पाहुण्यांची ओळख जिल्हाध्यक्ष प्रा. एस.एन.पाटील तर आभार सचिव संदेश तुळसणकर यांनी मांडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page