चौके /-

आपल्या देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यानंतर त्याचा संसर्ग महाराष्ट्रासह देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरातही झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली आणि त्यामुळे सर्वत्र २२ मार्च २०२० पासून कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला. तेव्हापासून आतापर्यंत या महाभयंकर कोरोना महामारी विरोधात डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी , महसूल कर्मचारी, मुंबई महानगर पलिका अधिकारी कर्मचारी हे खऱ्या अर्थाने कोविड योद्धा बनून स्वतःचा जीव धोक्यात घालून लढाई लढत आहेत.
लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात त्याची अंमलबजावणी करण्याची आव्हानात्मक जबाबदारी मुख्यत्वे पोलीस प्रशासनावर आली. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून मुंबई पोलीसांनी अतिशय समर्थपणे ही जबाबदारी पार पाडली त्याबद्दल त्यांचे कौतुक करावेच लागेल.
मुंबई पोलीस दलातील काही निवडक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनी केवळ लॉकडाउन बंदोबस्तापुरते मर्यादित न राहता कोरोना काळात गरजवंतांना अनेक प्रकारे मदत करण्याचे उल्लेखनीय असे अतिरिक्त कार्य केलेले आहे. अशा निवडक अधिकाऱ्यांपैकी प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल तो मालवण तालुक्यातील काळसे गावचे सुपुत्र असलेले आणि सध्या बोरीवली पोलीस स्थानकात पोलीस निरीक्षक पदी कार्यरत असलेले श्री विजय बाळकृष्ण माडये हे होय.
कर्तव्य तत्पर पोलीस निरीक्षक श्री. विजय माडये यांनी मुंबई पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या व कोरोनाविरूद्धच्या लढाईत लॉक डाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत शहीद झालेल्या ५४ पोलीस अधिकारी / कर्मचारी यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५०,०००/- रुपये असा एकूण रुपये २७, ००,००० /- ( सत्तावीस लाख) निधी उभारण्यात आणि सदर निधीचे वाटप करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. महत्वाची भुमिका पार पाडली. सदर निधी जयकर एक्सपोर्ट प्रा. लि. या कंपनीने विजय माडये यांच्या विनंतीवरुन शहीदांसाठी दिला. त्यासाठी कंपनी डायरेक्टर कल्पेश शहा यांचे सहकार्य मिळाले. आर्थिक मदतीचे धनादेश हे माननीय सह पोलीस आयुक्त प्रशासन यांच्या हस्ते व माननीय अपर पोलीस आयुक्त उत्तर प्रदेश विभाग यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर प्रादेशिक विभागातील कार्यरत पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे धनादेश संबंधित प्रादेशिक विभागात पाठवण्यात आले होते तिथून ते वाटप करण्यात आले. या व्यतिरिक्त दहिसर पोलीस ठाण्याचे दिवंगत पोलीस हवालदार सुभाष हंकारे यांच्या पत्नीस रुपये १६,०००/- ची आर्थिक मदत उपलब्ध करून दिली. लॉकडाउन सुरू झाल्यापासून सतत प्रत्येक चौकात, मोठी कॉम्प्लेक्स , सोसायट्या, ईमारती, चाळी, झोपडपट्टी येथे प्रत्यक्ष जाऊन मेगाफोनद्वारे अथवा मिटींग घेऊन कोरोना संदर्भात बोरीवली पोलीस ठाणे हद्दीतील जवळजवळ ९०% विभागात जनजागृती केली.
पोलीस निरीक्षक विजय माडये यांनी बोरीवली पोलीस ठाणे हद्दीतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील गरजूंना सोसायट्या व सेवाभावी संस्था यादी आवाहन करून त्यांच्या माध्यमातून प्रत्येकी १२ ते १५ किलो वजनाच्या रेशनिंग साहित्याच्या जवळपास ५००० किटचे वाटप केले. डॉ. पुरोहित यांच्याकडून ६०० ते ७०० स्थलांतरीत मजुरांची मोफत वैद्यकीय चाचणी करून घेण्यात पुढाकार घेतला. तसेच १५ दिवस स्थलांतरीत मजुरांसाठी सोसायट्या व ट्रस्ट यांना आवाहन करून त्यांच्या माध्यमातून मजुरांना सकाळचा नाष्टा, दुपारचे व रात्रीचे जेवण, पिण्याच्या पाण्याच्या बॉटल्स, केळी, ईलेक्ट्रॉल पावडर, बिस्किटे आदी उपलब्ध करून दिले. कडक लॉकडाउन काळात रहिवाशांची गैरसोय लक्षात घेऊन पोलीस वसाहतीत व बोरीवली परिसरात महानगर पालिकेच्या व खाजगी भाजीपाला व फळे विक्रेत्यांच्या मदतीने २५ ते ३० टेंपो नियमित उपलब्ध करून दिले.
डि मार्ट व रिलायन्स या मेगा स्टोअर्सशी समन्वय साधून पोलीस वसाहत व काही सोसायट्यांमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा माफक दरात थेट पुरवठा सुरू केला. तसेच पोलीस वसाहतीमधील १५० कुटुंबीयांना रेशनिंग किटचे वाटप केले. याकामी त्यांना स्नेहल जैन तसेच मुकेश मेहता , अमर शहा यांचे विशेष सहकार्य लाभले.
बोरीवली पोलीस स्थानकाच्या हद्दीत लॉकडाउन १००% यशस्वी करण्यासाठी तत्परतेने कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना नाकाबंदीकरीता उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून मुंबईत सर्वप्रथम रस्त्याच्या मधोमध भव्य पॅडोल उभा केला. नाकाबंदी साठी नेमलेल्या अधिकारी व अंमलदार यांनी नियमित एनर्जी ड्रिंक्स, पिण्याचे पाणी, चहा व नाश्ता सुध्दा उपलब्ध करून दिला. तसेच नाकाबंदी दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून अधिकारी व अंमलदार यांना मास्क व फेसशिल्ड उपलब्ध करून दिले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना महामारी विरोधात लढणाऱ्या पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांची कोव्हिड – १९ टेस्ट करून जर कोणी पॉझिटिव्ह असेल तर रुग्णालयाशी संपर्क साधून त्यांना बेड उपलब्ध करून घेणे, रुग्णवाहिका उपलब्ध करून संबंधितांना रुग्णालयात दाखल करून घेणे. हे कार्य आणि नोकरी व्यतिरिक्त एक माणूस म्हणून सर्व स्तरातील गरजवंतांना सर्वतोपरी मदत पोचविण्याचे कार्य विजय माडये गेले पाच – सहा महिने अविरतपणे पार पाडत आहेत.
अशाप्रकारे कोरोना महामारीविरूध्दच्या लढ्यात मुंबई पोलीस विभागातील उल्लेखनीय कामगिरी केलेल्या ८ अधिकारी व अंमलदारांची मा. पोलीस आयुक्त बृहन्मुंबई यांनी विशेष कोव्हिड योद्धे म्हणून निवड करण्यात आली असून त्यामध्ये बोरीवली पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्री. विजय माडये यांची निवड करण्यात आली. तसेच श्री. विजय माडये यांनी कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कामाची पोलिस आयुक्त कार्यालयाने दखल घेऊन बँक ऑफ बडोदा व बिसलेरी कंपनी यांना माहिती पाठवली होती. या दोन्ही कंपन्यांनी विजय माडये यांचा सत्कार केलेला आहे. संपूर्ण मुंबई पोलिस दलात जवळ 60 ते 70 हजार पोलिस अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहेत त्यांच्यापैकी केवळ चार ते पाच पोलिसांची ” सुपर हिरोज ” म्हणून निवड केलेली आहे यामध्ये पोलीस निरीक्षक विजय माडये हे एकमेव अधिकारी असून इतर चारजण पोलीस कर्मचारी आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page