कणकवली /-

गेले दोन दिवस सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे विजयदुर्ग खाडीला पुर आल्याने तर सह्याद्री खोऱ्यात मोठ्या प्रमाणात पर्जन्यवृष्टी झाल्याने खारेपाटण येथील शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून यामुळे खारेपाटण गावात पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

गेली काही दिवस पावसाने दडी मारल्यानंतर रविवार पासून पावसाने पुन्हा एकदा जोरदार मुसंडी मारली असून नदी नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तर चिंताग्रस्त असलेला कोकणातील शेतकरी या पावसामुळे काहीसा सुखावला असून शेतीच्या कामांना पुन्हा एकदा जोर घेतला आहे. खारेपाटण येथे पूरपरिस्थिती मुळे शुक नदीपात्राचे पाणी खारेपाटण शहरात घुसले असून यामुळे खारेपाटण घोडेपाथर बंदर येथे पुराचे पाणी आले असून खारेपाटण बाजारपेठ मधून बंदरवाडी व सम्यकनगर कडे जाणार रस्ता पुराच्या पाण्याच्या खाली गेला आहे. त्यामुळे येथील लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे. तर खारेपाटण मासळी मार्केट इमारतीला पुराच्या पाण्याने वेढले आहे. याचबरोबर खारेपाटण बाजारपेठेतून कालभैरव मंदिराकडे जाणारा रस्ता पुराच्या पाण्याखाली गेला असून येथील वाहतूक बंद आहे. खारेपाटण मधील बिगे व भाटले येथील शेती पाण्याखाली गेली असून सुमारे ५ फूट पेक्षा अधिक पाणी शेत पिकात घुसले उभे पीक पाण्याखाली गेले आहे. मुंबई – गोवा महामार्गावरून खारेपाटण शहरात येणारा मुख्य रस्ता खारेपाटण हायस्कुल रोड ते खारेपाटण बसस्थानक हा रस्ता देखील पाण्याखाली जाऊन वाहतूक बंद होण्याच्या स्थितीत आहे.

खारेपाटण येथील सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक इमारतीचा तळमजला पूर्ण पाण्याखाली बुडाला असून पहिल्या मजल्यावरील व्यापारी गाळे धारक पुराच्या भीतीने आपल्या वस्तूची आवराआवर करत आहेत. जर पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास खारेपाटण बाजारपेठेत पुराचे पाणी शिरण्याची दाट शक्यता असून खारेपाटण मधील व्यापारी भीतीच्या छायेखाली आहेत.

खारेपाटण – चिंचवली रस्ता बंद

शुक नदीने धोक्याची पातळी ओलांडल्याने पुराचे पाणी खारेपाटण – चिंचवली रस्त्यावर आले असून हा रस्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे चिंचवली मार्गावरील वाहतूक पूर्ण बंद झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page