मुंबई /-

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्ताराची जेवढी चर्चा महाराष्ट्रात आहे त्यापेक्षा जास्त चर्चा ठाकरे सरकारच्या अस्तित्वाची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला टाळलेल्या पत्रकार परिषदेमुळे तर चर्चेला आणखीनच उधान आलंय

एकाबाजूला जे बिहारमध्ये महागठबंधनचं झालं तेच महाराष्ट्रात महाआघाडीचं होणार अशी वृत्त पसरवली जातं आहेत. म्हणजे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेच असतील. भाजपाला दोन उपमुख्यमंत्रीपद दिले जातील. फडणवीसांना केंद्रात पाठवलं जाईल अशा फॉर्म्युल्याची चर्चा गेल्या काही दिवसात जोरदार आहे. खुद्द फडणवीसांनी मात्र मी केंद्रात जाणार नसल्याचं स्पष्ट केलंय. त्यानंतरही ही चर्चा काही थांबलेली नाही. मोदी सरकारचा लवकरच मंत्रिमंडळ विस्तार आहे. त्यातही सेनेला स्थान दिलं जाईल असं वृत्त देखील प्रसिद्ध झालंय. त्यापार्श्वभूमीवर तर महाराष्ट्रात सत्तेचा नवा डाव खेळला जातोय असं चित्र माध्यम रंगवताना दिसत आहेत.

एक तर शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही आघाडीच ‘अनैसर्गिक’ असल्याचा दावा, आरोप भाजपा करतंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातही कुठल्याही क्षण सत्ता बदलाचा ‘बिहारी पॅटर्न’ अस्तित्वात येईल अशी चर्चा सुरु झाली आहे. या पॅटर्ननुसार जसे नितीशकुमार लालू यादव यांना सोडून भाजपसोबत आले तसेच उद्धव ठाकरे हे शरद पवारांना सोडून भाजपसोबत येतील अशी चर्चा सुरु झाली आहे. मात्र, उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी सोडण्यात येणाऱ्या राजकीय पुड्या एवढंच त्याला समजावं लागेल. एवढं सगळं होतं असेल आणि त्यासाठी कल्पना शरद पवारांच्या राष्ट्रवादीला आणि कॉग्रेस पक्षातील श्रेष्ठीना नसेल असं समजणं म्हणजे राजकारण कळत नाही एवढंच म्हणावं लागेल. कारण, बिहार मध्ये जे घडलं ते आधीच ठरलं होतं आणि त्यामुळे त्याचा संदर्भ महाराष्ट्रात जोडणं म्हणजे कहर म्हणावा लागेल. त्यात भाजप हा किती घातक योजना आखणारा पक्ष आहे ते उद्धव ठाकरेंना समजलं आणि त्यावेळीच त्यांनी काँग्रेस-राष्ट्र्वादीसोबत जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यात नारायण राणेंना मंत्रिमंडळात स्थान म्हणजे भाजप शिवसेनेसोबत किंवा शिवसेना भाजपसोबत किमान पुढील ४ वर्ष एकत्र येणार नाहीत याचे संकेत म्हणावे लागतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page