मालवण /-

वेंगुर्ला येथून देवगडच्या दिशेने सुमारे दीड लाख रुपये किंमतीच्या गोवा बनावटीच्या बेकायदेशीर दारूची वाहतूक करणारी स्वीप्ट गाडी आचरा पारवाडी येथील पुलावर पोलिसांनी पकडल्याची घटना आज सकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे पोलिसांनी या गाडीविषयी खबर मिळाल्यानंतर पोलिसानी सापळा रचला होता. दरम्यान पुलावर उभे असलेल्या पोलिसांना बघून संबंधितांनी गाडी मागे घेऊन पळण्याचा प्रयत्न केला असता या गाडीच्या मागाहून येणाऱ्या श्री मंगेश टेमकर यांच्या गाडीला जोराची धडक बसल्याने या अपघातात दोघे जण जखमी झाले असून त्या दोघांना पोलिसांनी ओरोस येथे उपचारासाठी दाखल केल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या लॉकडाऊनचा फायदा उठवीत सकाळी व रात्रीच्या वेळेत अवैधरित्या गोवा बनावटीच्या दारूच्या वाहतुकीचा सुळसुळाट जिल्ह्यात सुरू आहे. आज सकाळी एका गाडीतून वेंगुर्लाहुन देवगड येथे गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करण्यात येत असल्याची टीप पोलिस यंत्रणेला मिळाल्यानंतर नंतर या मार्गावर आचरा पोलिसांनी या गाडीला पकडण्यासाठी सापळा रचला होता. यासाठी आचरा पारवाडी पुलावर पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. ही गाडी पारवाडी पुलाकडे आली असता पोलिसांना पाहून त्या गाडीच्या चालकाने गाडी माघारी घेऊन पळण्याचा प्रयत्न केला. मात्र गाडी वळवून मागे पळण्याच्या बेतात असतानाच मागाहून येणारे आचरा गावचे माजी सरपंच मंगेश टेमकर यांच्या या गाडीला या गाडीची समोरासमोर धडक बसली. यामुळे झालेल्या अपघातात दारू वाहतूक करणाऱ्या गाडीतील दोघेजण जखमी झाले. यावेळी पोलिसांनी त्या दोघांसह गाडी ताब्यात घेतली असून त्या दोघांना उपचारासाठी ओरोस येथील रुग्णालयात दाखल केले. या गाडीतून सुमारे दीड लाख रुपये किमतीच्या दारूची वाहतूक करण्यात येत होती असे समजते. या बाबत आचरे पोलीस निरीक्षक श्री काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page