कुडाळ /-

आज शिवसेनेचा ५५ वा वर्धापनदिन होता. जिल्ह्याची आरोग्य व्यवस्था कोलमडली असताना जिल्ह्यात शिवसेनेमार्फत काहीतरी चांगले, समाजोपयोगी असे उपक्रम व्हायला हवे होते. पण भाजपा कार्यकर्त्यांना डिवचण्यासाठी त्यांना मोफत पेट्रोल देण्यासारखी प्रक्षोभक जाहिरातबाजी करण्याच्या खालच्या पातळीवर हा आमदार वैभव नाईक आला. कधी काही चांगले केलेच नाही, करण्याची अक्कल नाही. पोलिसांच्या संरक्षणात लपत कोणीही स्टंटबाजी करू शकतो. त्याला कुठे हिंमत लागते. एकदा पोलिसांना बाजूला करून सामोरा ये, मग कळेल कोणात किती हिंमत आहे ते, अशी आक्रमक प्रतिक्रिया आजच्या कुडाळमधील भाजपा-शिवसेना राड्याच्या पार्श्वभूमीवर भाजपा नेते निलेश राणे यांनी दिली आहे.

भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे पुढे म्हणाले आहेत, की आज शिवसेनेचा वर्धापन दिन म्हंटल्यावर असं वाटलं होतं की शिवसेना काहीतरी चांगलं काम करेल. पण फुकट्या आमदार वैभव नाईक हा आमच्या पेट्रोल पंपाच्या बाहेर उभा राहून कसलीतरी पेट्रोल वाटपाची स्कीम राबवु पहात होता. या स्कीममध्ये चक्क आमची एनओसी न घेता उधारीवर पेट्रोल मागायला आला होता. त्याला आमच्या लोकांनी हाकलून लावला. स्टंटबाजी करून लक्ष वेधून घेण्याचा त्याचा डाव आमच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावला. फटके पडू नये म्हणून नेहमीप्रमाणेच पोलिसांच्या गराड्यात तो निसटला.

उधारी मागायची होती तर रीतसर तरी मागायची होती. सेनेचा वर्धापन दिन म्हंटल्यावर आम्ही सहानुभूतीने विचार केलाही असता. याला बाकी कोणी उधारी देणार नाही, दिली तर राणेच देतील याचा त्याला विश्वास असावा. आम्ही जिल्ह्यात नव्हतो नाहीतर शिवसेनेच्या वर्धापनदिनासाठी उधारी दिलीही असती. लोकांना एवढं हलक्यात घेऊ नकोस. असली पोकळ स्टंटबाजी करून समाजात तुझी किंमत वाढणार नाही. २०२४ मध्ये तुझा पराभव निश्चित आहे. राणेविरोधावर जगणे हीच तुमची कारकीर्द म्हणून इतिहासात नोंद होईल, असा सणसणीत टोल निलेश राणे यांनी वैभव नाईक यांना लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page