मुंबई /-

मुंबईत शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले असून तुफान राडा झाला आहे. शिवसेना भवनसमोर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त हाणामारी झाली आहे. राम मंदिरावरुन शिवसेनेकडून करण्यात आलेल्या टीकेमुळे हा वाद झाल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान हाणामारीमुळे परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

अयोध्येतील राम मंदिर उभारणीसाठी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासने (ट्रस्ट) केलेल्या जमीन खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन शिवसेनेकडून टीका करण्यात आली होती. शिवसेनेकडून घेण्यात आलेल्या भूमिकेविरोधात भाजपा जनता युवा मोर्चाकडून शिवसेना भवनच्या बाहेर आंदोलन करण्यात आलं. दरम्यान शिवसेना भवनच्या बाहेर भाजपाचं आंदोलन सुरु असल्याची माहिती मिळताच मोठ्या प्रमाणात शिवसेना कार्यकर्तेत तिथे दाखल झाले. यादरम्यान शिवसेना आणि भाजपा कार्यकर्ते आमने-सामने आले आणि तुफान हाणामारी झाली.

परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पोलिसांनी भाजपा जनता युवा मोर्चाच्या जवळपास ४० कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. शिवसेनेच्याही काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं असून पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं आहे.

“भाजपाचे कार्यकर्ते आंदोलन करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते शिवेसना भवनमध्ये जमले होते. भाजपाचे काही कार्यकर्ते दगडफेक करणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. यामुळे शिवसैनिकांनी त्यांना थाबवलं असता बाचाबाची झाली,” अशी माहिती स्थानिक शिवसेना आमदार सदा सरवणकर यांनी एबीपी माझाशी बोलताना दिली आहे. शिवसेना भवनवर कोणी चाल करणार असेल तर प्रतिकार करणार हेच शिवसैनिकांनी माहिती असून तेच केलं आहे असंही त्यांनी सांगितलं.

अयोध्या जमीन गैरव्यहार प्रकरण काय आहे?

लखनौमध्ये ‘आप’चे खासदार संजय सिंह आणि समाजवादी पक्षाचे नेते पवन पांडे यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन ट्रस्टने जमीनखरेदीत घोटाळा केल्याचा आरोप केला. दोन कोटींची जमीन अवघ्या पाच मिनिटांत १८.५ कोटी रुपयांना ट्रस्टने खरेदी केली असून, या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय व सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) चौकशी करण्याची मागणी संजय सिंह यांनी केली.

*दरम्यान ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी निवेदन प्रसिद्ध करत आरोप फेटाळले आहेत. ‘‘गेले १०० वर्ष आमच्या वर कुठले ना कुठले आरोप झाले आहेत. महात्मा गांधी यांची हत्या केल्याचाही आरोप आमच्यावर केला गेला. अशा कोणत्याही आरोपांची आम्ही पर्वा करत नाही. या नव्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे याची शहानिशा करून प्रत्युत्तर दिले जाईल,’’ असे चंपत राय यांनी पत्रकारांना सांगितले.

सरसंघचालकांनी भूमिका मांडावी : शिवसेना

अयोध्येत जमीन खरेदीत मोठा भ्रष्टाचार असल्याचे आरोप व त्याबाबतची कागदपत्रे समोर आली आहे. अशाप्रकारचा घोटाळा हिंदूंसाठी संतापजनक असून या प्रकरणाबाबत संस्थेबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, विश्व हिंदू परिषदनेही भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेनेने के ली आहे.

प्रभू श्रीराम आणि अयोध्या हा आमच्या श्रद्धा आणि आस्थेचा विषय आहे. काही जणांनी त्याचे राजकारण केले असेल पण आम्ही तसे के ले नाही. राम मंदिर विश्वस्त संस्थेचे सर्व सदस्य भाजप सरकारच्या वतीने नेमण्यात आले आहेत, असे शिवसेनेचे खासदार व मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हणाले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आम्ही अयोध्येला गेलो त्यावेळी ठाकरे यांनी शिवसेनेतर्फे एक कोटी रुपयांची रक्कम दिली होती. राम मंदिराच्या नावे देशभरातून-परदेशातून शेकडो कोटी रुपये गोळा झाले आहेत. प्रभू श्रीराम यांच्या नावे एका पैशाचाही घोटाळा होऊ नये. पण जमिनीच्या खरेदीतील घोटाळ्याचे प्रकरण समोर आल्याने श्रद्धेला ठेच लागली आहे. राम मंदिर विश्वस्त संस्थेच्या प्रमुखांनी याबाबत भूमिका स्पष्ट के ली पाहिजे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि विश्व हिंदू परिषदेच्या नेत्यांनीही भूमिका स्पष्ट करणे गरजेचं आहे, असे संजय राऊत यांनी नमूद केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page