रास्त दरात हळद बियाणे वितरणाला डॉ. हेडगेवार प्रकल्प येथे सुरुवात..

कुडाळ /-

रास्त दरात हळद बियाणे वितरणाला डॉ. हेडगेवार प्रकल्प येथे सुरुवात..

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कामाला सुरुवात केलेल्या सिंधु आत्मनिर्भर अभियानाने गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणावर हळद लागवडीचा प्रयोग जिल्ह्यात यशस्वी केला.सिंधु आत्मनिर्भर अभियानाला भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठान,डॉ हेडगेवार प्रकल्प,माणगांव तसेच के एस आर इंटरप्रयझेस डोंबिवली या संस्थांनी सहकार्य केले,या उपक्रमात मोठे योगदान दिलेले आहे.
या अभियानातून प्रेरणा घेत जिल्हा परिषदेच्या उमेद अंतर्गत बचत गटांच्या माध्यमातून हळद लागवडीचे मोठे अभियान जिल्ह्यात उभे राहिले,आणि एका नव्या क्रांतीची नांदी झाली.त्यामुळे यावेळी सिंधू आत्मनिर्भर अभियानाच्या माध्यमातून रास्त दरात हळद बियाणे देत हे अभियान अजून जोमाने सुरू करण्याचे ठरविण्यात आले.
सिंधु आत्मनिर्भर अभियान, माध्यमातून या पूर्वी वितरित केलेले मोफत हळद बियाणे,योग्य मार्गदर्शन,आणि उत्पादन पश्चात प्रक्रिया आणि विक्री याची जिल्ह्यात उभी राहिलेली यंत्रणा यामुळे शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे कल वाढल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक तथा सिंधू आत्मनिर्भर अभियानाचे मुख्य संयोजक अतुल काळसेकर यांनी दिली. काळसेकर पुढे म्हणाले, बाजारात असलेला हळद बियाण्याचा दर,जो आज रोजी 70 ते 90 रुपये प्रतिकिलो इतका आहे,यासोबत इतर सर्व खर्च आणि होणारे उत्पन्न लक्षात घेता या हळद शेतीचे गणित जुळेल का?
अशी एक चर्चा जिल्ह्यात सुरू होती.काही वृत्तपत्रानी सुद्धा यावर लिहिले होते.
यावर विचार करताना भारतीय जनता पार्टीच्या सिंधु आत्मनिर्भर अभियानाने शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतलेला आहे. मोठ्या प्रमाणात हळद लागवड करणारे बचतगट किंवा शेतकरी याना अभियानाच्या माध्यमातून कमी दरात हळद बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.हा दर साधारण प्रतिकिलो 36/रुपये असा निश्चित करण्यात आलेला आहे.सदरचे सेलम जातीचे हळद बियाणे सिंधू आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत डॉ हेडगेवार प्रकल्प माणगांव येथे उपलब्ध करण्यात आले आहे.
सध्या हळद बियाणे जिल्ह्याबाहेरून उपलब्ध करावे लागते.त्यामुळे जिल्ह्यात ‘हळद बियाणे बँक’ तयार करण्याची आमची संकल्पना आहे.
त्यामुळे यावर्षी बियाणे घेऊन हळद लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा हळद बियाणे आमच्याकडे आणून द्यावे, रास्त दरात ते अभियानाकडून खरेदी केले जाईल.अश्या पद्धतीने बियाणे एकत्रित करून त्याची शास्त्रशुद्ध साठवणूक केली तर जिल्ह्यात हळद बियाणे बँक तयार होईल असा विश्वास श्री काळसेकर यांनी व्यक्त केला.
हळद लागवडच का?
जागतिक तापमान वाढीचा परिणाम सर्वत्र दिसत असून अश्यावेळी बहुआयामी पीक पद्धती महत्वाची आहे.जिल्ह्यात काजु आंबा नारळ सुपारी आणि भातशेती सोबत हळद आंतरपीक म्हणून सहाय्यकारी ठरेलं.याला
कीड रोगाचा त्रास फार कमी तसेच वन्यप्राण्यांपासून सुरक्षित असे पीक आहे.
यूरोप मध्ये तर याला पिवळे सोने (यलो गोल्ड) म्हटले जाते.कोविड नंतर चर्चेत असणारी हळद औषध म्हणून मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरेल.
जिल्ह्यासाठी बियाणे बदल व पीक बदल जमिनीच्या स्वास्थासाठी महत्वाचा आहे.या बाबी हळूहळू येथील शेतकऱ्यांच्या लक्षात येत आहेत.
सिंधु आत्मनिर्भर अभियानाचे संकल्प

सिंधू आत्मनिर्भर अभियान या ऑरगॅनिक हळदीचा एक मालवणी ब्रँड बाजारात आणण्याच्या विचारात असून मुंबईतील चाकरमानी मंडळींना तो क्लिक होईल असे श्री काळसेकर यांनी सांगितले.

टाटा समूहाच्या ‘करार शेती’च्या धर्तीवर हळद लागवडीची करार शेती पद्धत रुजू करणे,त्या पद्धतीचे सेलम हळद हे एक मॉडेल होईल.

आपल्या कृषी विभागाला ही एक मोठी संधी आहें. कृषी विद्यापीठाने यावर संशोधन सुरू करावे. अभियानाचे सर्व सदस्य सोबत असतील,सर्व यंत्रणा लागली तर याविषयात जादू होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील महामार्गाच्या दुभाजका मधील मोकळ्या जागेत हळद लागवडीची कल्पना आहे.ग्रामसंघ, बचतगट, शेकऱ्यानी ती जबाबदारी घ्यावी. ग्रामसंघांनी किमान 25 किलो हळद बियाणे लागवड करावी असे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विस्तीर्ण पसरलेली

हळदीची हिरवीगार शेती पर्यटकांचे लक्ष वेधून घेणारी ठरेल.

सर्व शाळा परिसरात

हळदीची लागवड करण्याचा प्रयत्न आहे.ज्या संस्था त्यासाठी पुढाकार घेतील, त्यांना अभियानाच्या माध्यमातून रास्त दरात बियाणे आणि मार्गदर्शन देण्यात येईल.अशी माहिती श्री अतुल काळसेकर,संयोजक,सिंधु आत्मनिर्भर अभियान यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page