मालवण /-


मालवण तालुक्यातील कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी कडक उपाययोजनांच्या अंमलबजावणीचे आदेश प्रांताधिकारी वंदना खरमाळे यांनी मालवण तालुक्यातील प्रशासकीय प्रमुखांना दिले आहेत.

मालवण पत्रकार समितीच्या वतीने बुधवारी मालवण तहसीलदार अजय पाटणे यांची भेट घेऊन मालवण कोरोनामुक्तीसाठी गतवर्षीचा पॅटर्न राबवा. नियमांची कडक अंमलबजावणी करा. हॉटस्पॉट भागात अधिक तपासण्या वाढवा. यासह अन्य सूचनावजा मागण्या करण्यात आल्या होत्या.

या पार्श्वभूमीवर तहसीलदार अजय पाटणे यांनी प्रांताधिकारी यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार प्रांताधिकारी यांच्या उपस्थितीत गुरुवारी मालवण तहसीलदार कार्यालय येथे बैठक पार पडली. यावेळी तहसीलदार अजय पाटणे, पोलीस अधीक्षक एस एस ओटवणेकर, आचरा पोलीस निरीक्षक शामराव काळे, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ कुबेर मिठारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ बालाजी पाटील आदी उपस्थित होते.

कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना सुरू आहेत. मात्र यापुढे अधिक कडक पद्धतीने नियमांची अंमलबजावणी करा. वाढती कोरोना रुग्णासंख्या असलेल्या शहर व गावातील भागात कोरोना आरटीपीसीआर तपासण्या वाढवा. कंटेंटमेंट झोन स्पष्ट व ठळक दिसतील असे करा. विनाकारण फिरणारे अथवा गर्दी होणारी ठिकाणे याकडे पोलीस प्रशासनाने लक्ष देऊन कारवाई करावी. कोरोना नियमांचे उल्लंघन होत असेल आणि सांगूनही कोणी ऐकत नसतील तर प्रसंगी गुन्हे दाखल करा. यासह कोरोना नियंत्रणाच्या दृष्टीने आवश्यक सूचना प्रांताधिकारी यांनी दिल्या.

ताप, सर्दी रुग्णांची नोंद ठेवा

अनेकवेळा लक्षणे दिसूनही नागरिक कोरोना तपासणी करण्यास पुढे येत नाहीत. अंगावर काढणे असे प्रकार होतात. काहीवेळा खाजगी दवाखान्यात जाऊन औषध, गोळ्या घेतल्या जातात. खाजगी दवाखान्यात उपचार घेण्यास कोणतीही बंधने नाहीत. खाजगी दवाखान्यातही कोरोना खबरदारी नियमांचे पालन योग्य पद्धतीने होते. लक्षणे दिसणाऱ्या रुग्णांना तपासणी बाबतही सूचना दिल्या जातात. मात्र ताप, सर्दी अशी लक्षणे असणारे रुग्ण तपासणीस आल्यास त्यांची नोंद खाजगी डॉक्टरांनी ठेवावी. आरोग्य विभाग त्या नावनोंदी घेऊन आवश्यकता वाटल्यास रुग्णांच्या कोरोना तपासण्या करेल. तरी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार अजय पाटणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page