सावंतवाडी /-

काल शहरात घडलेल्या प्रकरणावरून सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी नगराध्यक्ष संजू परब यांचा राजीनामा मागण्यापेक्षा पोलिस तेथे उपस्थित असून देखील काही का करू शकले नाहीत. असा सवाल महाभकास आघाडी सरकारमधील गृह खात्याला विचारावा अशी टीका भाजप शहर अध्यक्ष अजय गोंदावळे यांनी केली आहे.

आमदार दिपक केसरकर हे गृह राज्यमंत्री आणि आमदार असताना आंबोली येथे अनेक गैरप्रकार घडले होते. यावेळी रुपेश राऊळ यांनी त्यांच्याकडे राजीनामा का मागितला नाही असा सवाल गोंदावळे यांनी उपस्थित केला आहे. संजू परब नगराध्यक्ष होऊन त्यानी शहरात चांगले निर्णय घेतले असून, त्यामुळे नागरिक समाधानी आहेत. परंतु, संजू परब नगराध्यक्ष झाले ही गोष्ट माजी नगराध्यक्ष आणि सेना तालुकाप्रमुख पचवू शकले नसून, त्यामुळेच ते शहराची बदनामी करत असल्याचा आरोप अजय गोंदावळे यांनी केला आहे. ज्या पार्किंग वरून हा वाद झाला त्या ठिकाणी गेले कित्येक वर्षे कोरगावकर हे आपल्या गाड्या पार्क करत आहेत. त्यावेळी माजी नगराध्यक्ष आणि सेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ झोपले होते का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. अशा लोकांना श्री देव उपरलकर, श्री देव पाटेकर, आणि बापुसाहेब महाराज यांचे नाव घेण्याचा नैतिक अधिकार नाही. असे देखील ते यावेळी म्हणाले आहेत.

यावेळी त्यांनी काल शहरात घडलेल्या घटनेचा जाहीर निषेध केला असून, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून या घटना पुन्हा घडू नयेत याची काळजी घ्यावी असे मत व्यक्त केले आहे. यावेळी नगरसेवक आनंद नेवगी, अमित परब आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page