कुडाळ /-

कुडाळ एमआयडीसी येथे लिक्विड ऑक्सिजन रिफील प्लांटचे उदघाटन भविष्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शकयता आहे.त्यामुळे राज्यसरकार आरोग्य सुविधा बळकट करण्यावर भर देत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातही ऑक्सिजनची क्षमता वाढवणे, आरोग्य सुविधा वाढवणे, चाचण्यांची क्षमता वाढवणे याचे नियोजन आतापासूनच करा. शासनाकडून आवश्यक ती सुविधा जिल्ह्याला दिली जाईल. लोकार्पण होत असलेल्या ऑक्सिजन प्लांटची क्षमता ६ टनाची आहे. ती क्षमता २० टनापर्यंत वाढवा ऑक्सिजनची कमतरता भासता नये यासाठी अगोदरच नियोजन करा. अजूनही ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या -त्या ठिकाणी ऑक्सिजन प्लांट बसवा. सरकार आता कोरोनामुक्त गाव हि योजना राबवित आहे. 'माझे कुटुंब माझी जबाबदारी', 'मी जबाबदार' या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. सर्वांनी छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकरित्या काम करून जिल्हा कोरोना मुक्त करावा. असे निर्देश मुख्यमंत्री ना.उद्धवजी ठाकरे यांनी दिले आहेत. अवघ्या १५ दिवसांत कुडाळ एमआयडीसी येथे युनायटेड एअर गॅस प्रा.लि. कंपनीने उभारलेल्या नवीन लिक्विड ऑक्सिजन रिफील प्लांटचे ऑनलाईन उदघाटन आज मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. कमीत कमी दिवसांत उभारण्यात आलेला राज्यातील हा पहिला ऑक्सिजन प्लांट असून ६ हजार लिटर एवढी ऑक्सिजन साठवण क्षमता आहेत.यामध्ये ३० ड्यूरा सिलेंडर किंवा ६०० जंबो सॉलिडर रिफील होणार आहेत. याप्रसंगी खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, कुडाळ-मालवणचे आमदार वैभव नाईक आमदार दिपक केसरकर,जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी, जिल्हा पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.श्रीपाद पाटील, सहायक जिल्हाधिकारी संजित मोहोपात्रा, एमआयडीसीचे क्षेत्रीय संचालक अविनाश रेवणकर, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार अमोल पाठक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जि.प. गटनेते नागेंद्र परब,शिवसेना नेते संदेश पारकर,राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत,अमरसेन सावंत, काका कुडाळकर, राजन नाईक, जयभारत पालव, डॉ. निलेश बानावलीकर, युनायटेड एअर गॅस कंपनीचे अतुल नलावडे, सचिन आमरे तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन हे ऑनलाईन सहभागी झाले होते. *मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे म्हणाले,* कोकणच्या किनाऱ्यावर नेहमीच नैसर्गिक संकटे येत असतात. पाऊस, कधी अतिवृष्टी तर कधी चक्रीवादळ अशा संकटांबरोबरच कोविडचाही मुकाबला करत आहात. केवळ मुकाबला न करता एक एक पाऊले पुढे टाकत आहात. तोही आगदी आत्मविश्वासाने. त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून कौतुक करतो. पुढच्या संकटाची गंभीरता कमी करण्यासाठी तजवीज करणं आणि त्याचबरोबर संकट येणारच नाही त्यासाठी ही नियोजन करणं हे महत्वाचं आहे.लोकप्रतिनिधींनी मतदार यादीप्रमाणे कोरोनामुक्तीसाठी काम करावे. सर्व प्रथम 'माझे घर कोरोना मुक्त' यावर भर द्या असे त्यांनी सांगितले. *पालकमंत्री उदय सामंत म्हणाले,* जिल्ह्यामध्ये 22 अद्ययावत रुग्णवाहिका दाखल झाल्या आहेत. मॉड्युलर ओटीची संकल्पना घेऊन सिंधुदुर्ग, सावंतवाडी, कणकवली, कुडाळ या 4 ठिकाणी त्याची उभारणी करण्यात येणार आहेत. ऑक्सिजनमध्ये जिल्ह्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी दोन ऑक्सिजन प्लांट उभे केले आहेत. सावंतवाडी आणि कणकवलीला देखील ऑक्सिजनचे प्लांट उभे करतोय. तालुक्याच्या ठिकाणीही ऑक्सिजन प्लांट असावा, असा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे. काही ठिकाणी जिल्हा नियोजनमधून प्लांट उभारण्याचा निर्णय घेतला आहे. 565 ऑक्सिजन बेड आहेत. त्यामध्ये वाढ करून 1 हजार पर्यंत करतोय. तिसऱ्या लाटेला सामोरे जाताना आवश्यक ती सुविधा, साधन सामग्रीसह उभी करण्याचा आमचा प्रयत्न आहे. सारस्वत बॅँक, काही उद्योजक, काही स्वयंसेवी संस्था यांनीही सीएसआर फंडामधून योगदान दिले आहे. *खासदार विनायक राऊत म्हणाले,* मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या मिशन ऑक्सिजन अंतर्गत जिल्ह्यात अवघ्या 15 दिवसात 6 के.एल चा प्लांट उभा राहीला. यासाठी एमआयडीसीसह गतीमान प्रशासनाचे कौतुक करतो. असे सांगितले. *आमदार दीपक केसरकर* यांनी वेंगुर्ला रुग्णालयाचे उद्घाटन ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली. *आमदार वैभव नाईक म्हणाले* ऑक्सिजन प्लांटमुळे सरकारी व खाजगी रुग्णलयांची ऑक्सिजनची गैरसोय दूर होणार आहे. मुंबईतील चाकरमानी जिल्ह्यात येत आहेत त्यांचे लसीकरण याठिकाणी केले जात आहे. त्यामुळे जिल्ह्यासाठी लसीकरणाचे डोस वाढवून द्यावेत अशी मागणी आ. वैभव नाईक यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी स्वागत प्रास्ताविक करत ऑक्सिजन प्लांट उभारणीबाबतची सविस्तर माहिती दिली. प्लांट उभारणीबाबतची छोटी चित्रफित यावेळी दाखविण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page