मालवण /-

तौक्ते चक्रीवादळ येऊन ८ दिवस उलटून गेले आणि काल आठ दिवसांनी निलेश राणे मालवणातील नुकसानीची पाहणी करण्यासाठी आले. त्यामुळे त्यांना मालवणच्या जनतेबद्दल किती आस्था आहे हे यातून दिसून येते. याउलट आमदार वैभव नाईक यांनी गेले आठ दिवस मतदारसंघ पिंजून काढत नुकसानीची पाहणी केली नुकसानग्रस्तांना शिवसेनेच्या वतीने विविध प्रकारची मदत पुरविली.तसेच लोकांसोबत राहून त्यांनी मदतकार्य केले, नुकसानीचे पंचनामे करून घेतले. मात्र निलेश राणे या संकट काळात बंगल्यात बसून आराम करत होते. आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्यासाठी का होईना काल निलेश राणे मालवणात दाखल झाले त्याबद्दल त्यांचे आम्ही अभिनंदन करतो. असा उपहासात्मक टोला शिवसेना मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी लगावला आहे. हरी खोबरेकर पुढे म्हणाले, आ. वैभव नाईक यांनी नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या व सातत्याने त्यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला त्यामुळे नुकसानीचे पंचनामे देखील पूर्ण करण्यात आले आहेत. विद्युत पोल व वाहिन्यांवर झाडे पडून विद्युत पुरवठा खंडित झाला.त्यासंदर्भात आ. वैभव नाईक यांनी वीज वितरण विभागाच्या सातत्याने संपर्कात राहून लवकरात लवकर वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा ९० टक्के सुरळीत झाला आहे.पाठपुरावा करून इतर जिल्ह्यातील वीज वितरणचे कर्मचारी देखील जिल्ह्यात पाचारण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे तसेच इतर मंत्रीमहोदय देखील जिल्ह्यात आले आणि पाहणी केली. त्यांनी शासनाच्या माध्यमातून जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र निलेश राणे आठ दिवसांनी जागे झाले आणि त्यांना मालवणची आठवण आली. शिवसेनेच्या माध्यमातून नुकसानग्रस्तांना मदत केली जात असल्याने निलेश राणे वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यामुळेच शिवसेनेवर आरोप करत जनतेची दिशाभूल करून निलेश राणे आपली करपलेली राजकीय पोळी भाजून घेत आहेत. आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून सुरु असलेले काम जनता बघत आहे. निलेश राणे करत असलेल्या टीकेला जनता सिरीअस घेत नाही आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी निलेश राणे उठसूट कोणावरही टीका करत असतात.त्यामुळे शिवसेना निलेश राणेंच्या टीकेला भीक घालत नाही.हि वेळ राजकारण करण्याची नसून जे यात राजकारण करत आहेत त्यांना करूद्या. नुकसानग्रस्तांना लवकरात लवकर शासनाची मदत मिळवून देण्यासाठी आमचा पाठपुरावा सुरु आहे. असे हरी खोबरेकर यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page