रुग्णांच्या जीविताशी खेळणाऱ्या “देवदूतांची” योग्य चौकशी होणे गरजेचे!

भाजपा सोशल मीडिया सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश सदस्य अविनाश पराडकर यांची नाराजी..

सिंधुदुर्ग /-

काल सिंधूदुर्ग जिल्हा रुग्णालयातील कोविड विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अत्यंत दुर्दैवी पद्धतीने काम बंद करण्याची वेळ आली. या आंदोलनामागच्या परिस्थितीची योग्य वेळी दखल प्रशासनाकडून घेतली न गेल्याने कालचे काम बंद आंदोलन झाले आणि या सगळ्यात कोरोना रुग्णांचे हाल झाले. मागील काही काळापासून आम्ही आरोग्य यंत्रणेत आलबेल नसल्याची भावना व्यक्त केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी या परिस्थितीत डॉक्टर हे देवदूत असल्याचे मत मांडत यावेळी राजकारण न करण्याचा सल्ला दिला होता. आता जी परिस्थिती उद्भवली त्याची वेळीच दखल पालकमंत्री उदय सामंत आणि त्यांच्या सत्ताधारी सहकाऱ्यांनी घेण्याची गरज होती. पण भारतीय जनता पक्ष ज्यापद्धतीने जनतेत काम करतो आहे आणि आपल्याला त्यात अपयश येत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात मुख्यमंत्री भेटीचा आणि मंत्रीगणांच्या दौऱ्याचा कार्यक्रम आखून शह-काटशहाच्या राजकारणाचा खेळ मांडला. या सगळ्यात बेडकांचा खेळ झाला पण कोरोनाग्रस्तांचा जीव गेला. पालकमंत्री उदय सामंत यांच्या दुर्लक्षामुळेच काल जिल्हा रुग्णालयात कर्मचाऱ्यांना काम बंद करायची पाळी आली.

आजवर स्वतःच्या जीवाशी खेळत रुग्णसेवा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांवर ही वेळ का आली याची कारणे पालकमंत्र्यांनी शोधणे गरजेचे आहे आणि काही देवदूतांचे पंख जर फारच विस्तारत असतील तर वेळीच त्यांना आकार देऊन मर्यादेत ठेवणे गरजेचे आहे. रुग्णालयात चालणाऱ्या काहीजणांच्या गलिच्छ राजकारणापायी अत्यंत जीवतोड मेहनत अगदी उपाशीपोटी आणि बिनपगारीही करणाऱ्या अनेक चांगल्या आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांची राज्यात चुकीची प्रतिमा निर्माण झाली आहे. जिल्ह्याच्या या चुकीच्या प्रतिमेला परजिल्ह्यातले “पाहुणे पालकमंत्री” जबाबदार असून त्यांनी वेळीच या जिल्ह्याला आपले मानून परिस्थिती सुधारावी. राजकारणाची ही वेळ नाही हे मान्य, पण ही वेळ कोण आणते आहे आणि कशामुळे येते आहे याचा विचार कोरोनाग्रस्तांच्या दुर्दैवी अवस्थेनंतर करणार का, असा संतप्त सवाल अविनाश पराडकर यांनी केला आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालय हे जिल्ह्यातील एकमेव कोविड रुग्णालय असून याठिकाणी नियमित कर्मचाऱ्यांसोबतच हंगामी व अंशकालीन कर्मचारी काम करत आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांचा पगार झालेला नाही. अनेकांना कुटुंब चालवणे कठीण झाले आहे, त्यातच मागील कालावधीत बिले भरता न आल्याने काहींचे वीजमिटर महावितरणने कापण्याचाही पराक्रम करून दाखवला.तरीही हे कर्मचारी आपले काम प्रामाणिकपणे करतच आहेत.

त्यातच या कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना रुग्ण व नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक देणे, नियमबाह्य कामे देणे, मर्जीतल्या काही कर्मचाऱ्यांना कार्यक्षेत्राबाहेर वावरण्याची मुभा देत हवे तसे वागू देणे आदी प्रकारातून त्रास दिला जात होता. जिल्हाभरच्या कर्मचाऱ्यांच्या आलटून पालटून ड्युट्या लावत एकप्रकारे जिल्हाभर कोरोनाचा प्रसार करण्याचे कामही चुकीच्या पद्धतीने अधिकारी करत आहेत. कोरोना योद्धा म्हणून लढताना बळी पडलेल्या कर्मचाऱ्यांना साधी श्रद्धांजली वाहण्याचे सौजन्यही अधिकारी वर्गाने दाखवले नाही याची संतापजनक खदखददेखील कर्मचाऱ्यांमध्ये मागील काही दिवस होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मनमानी आणि अपमानास्पद वागणुकीला कंटाळत शेवटी काल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले. भाजपा आमदार नितेश राणे त्याठिकाणी पोहोचून मध्यस्ती केली नसती व कर्मचाऱ्यांना शांत केले नसते तर या आंदोलनाला वेगळे वळण लागून त्याचा परिणाम कोरोनाग्रस्तांवर थेट झाला असता. एवढ्या संवेदनशील विषयाकडे पालकमंत्री लक्ष देणार नसतील तर त्यापरते जिल्ह्याचे दुसरे दुर्दैव नाही.

पालकमंत्र्यांनी तातडीने यात लक्ष घालून कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करावी आणि कोरोनाकालीन निकषांचा गैरफायदा उठवत मनमानी करणाऱ्या “देवदूतांच्या” पंखानाही वेळीच आकार द्यावा, असे आवाहन भाजपाचे अविनाश पराडकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page