मनसे सरचिटणीस माजी आमदार जीजी उपरकर यांच्या संकल्पनेतून कुडाळ मनसेचा अभिनव उपक्रम..

कुडाळ /-

जिल्ह्यातील दिवसेंदिवस वाढती कोविड रुग्णसंख्या व मृत्यूदर नियंत्रणासाठी आरोग्य यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत आहे. या कोरोना विषाणू आपत्ती व्यवस्थापनात कोविड रुग्णांनी सकस आहार घेऊन इम्युनिटी वाढवणे हेच प्रमुख आरोग्य धोरण असल्याने कुडाळ तालुका मनसेने पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या सूचनेनुसार पुढील 15 दिवस कोविड रुग्णांना प्रोटीन वाढीसाठी उपयुक्त सकस आहार पुरवण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. त्याअनुषंगाने आज दि.20 मे 2021 रोजीपासून कुडाळ येथील बॅ.नाथ पै कोविड केअर सेंटर आणि महिला व बाल रुग्णालय येथील कोविड सेंटर ठिकाणी तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार केळी व उकडलेली अंडी रुग्णांसाठी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,तालुका सचिव राजेश टंगसाळी,माजी तालुकाध्यक्ष बाबल गावडे,उप तालुकाध्यक्ष दिपक गावडे,पिंगुळी ग्रामपंचायत सदस्य दिव्या दिपक गावडे आदी पदाधिकाऱ्यांनी कोविड सेंटर ठिकाणी दाखल रुग्णांसाठी सकस आहार सुपूर्द केले. आजपासून पुढील 15 दिवस सदरचे अभियान चालणार असून मनसेच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून कोविड रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page