शिक्षक समितीची प्रशासनाकडे मागणी..

मालवण /-
माझा सिंधुदुर्ग,माझी जबाबदारी या मोहिमेअंतर्गत गावातील घरोघरी कोव्हिडचे सर्वेक्षण करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र येथे सेवा देणे तसेच ग्रामपंचायत स्तरावर ग्राम संनियंत्रण समितीच्या कामकाजाचे पर्यवेक्षण करणे या कामासाठी तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना आदेश बजावण्यात आले आहेत. या आपत्कालीन परिस्थितीत शिक्षक राष्ट्रीय काम करण्यास अग्रेसर राहणार असून कोव्हिड काळात सेवा बजावणाऱ्या शिक्षकांना प्रथम प्राधान्याने लसीकरण करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती तालुका शाखेच्यावतीने गटविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली.
कोव्हिड १९ च्या पार्श्वभूमीवर तालुक्यात प्राथमिक शिक्षकांना विविध कामगिरी देण्यात आली आहे. काम करण्यास शिक्षक एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून तयार असून त्यांच्या समस्या मात्र दूर कराव्यात असे निवेदन शिक्षक समितीच्यावतीने गटविकास अधिकारी जयेंद्र जाधव यांना देण्यात आले. या निवेदनात कामगिरीवर असणाऱ्या सर्व शिक्षकांना प्राधान्याने लस देण्यात यावी. कामगिरीचे दुबार आदेश रद्द करून एकच जबाबदारी देण्यात यावी. कामकाज पार पडल्यावर जबाबदारी निभावणाऱ्या शिक्षकांना प्रमाणपत्र देण्यात यावे. विमा कवच लागू होण्यासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीचे संकलन नमुना पत्र भरून घेऊन लवकरात लवकर करावे. मुस्लिम बांधवांचे सध्या रमजान या पवित्र सणाचे रोजे चालू असल्याने त्यांना या कालावधीसाठी ड्युटीतून सूट द्यावी व पुढील कालावधीत आदेश बजवावेत. तसेच ड्युटी पूर्ण झाल्यावर परजिल्ह्यातील शिक्षकांना आपल्या मूळ गावी जाण्यासाठी परवानगी मिळावी. अशा समस्या मांडण्यात आल्या. या सर्व बाबींवर गटविकास अधिकारी यांनी सकारात्मक चर्चा केली. तसेच या सर्व समस्या निराकरण करण्यात येतील अशी ग्वाही दिली. तसेच त्यांनी संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना तसे आदेशित केले. या समस्या गटशिक्षणाधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय यांच्याही निदर्शनास आणण्यात आल्या.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी उदय दीक्षित, आरोग्य अधिकारी कुबेर मिठारी, विस्तार अधिकारी सूरज बांगर उपस्थित होते. संघटनेच्या वतीने शिक्षक समितीचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, तालुका सरचिटणीस नवनाथ भोळे, जिल्हा संघटक राजन जोशी, तालुका संघटक आरिफ कच्छी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page